राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता. दौंड) येथील प्रसिद्ध श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर येथे आचार्य श्री विश्वकल्याणसुरी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनात व आशिर्वादने दि. २४ ऑगस्टपासुन श्री पर्युषण महापर्वाची सुरुवात करण्यात आली होती. या महापर्वाच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.
रविवारी (ता. २८) श्री महावीर स्वामी भगवान यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मानंतर श्री महावीर स्वामी यांच्या पाळण्याची गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी विविध पारंपारिक पोशाख परिधान करत सहभाग घेतला. महापर्वाच्या निमित्ताने दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, सौ. सपनाबेन तुषार शहा यांनी पवित्र असा अठ्ठाई तप केल्याने उत्सवात अधिकच भर पडली. बुधवारी (ता. ३१) संत्वसरी क्षमापना विधीने पर्युषण महापर्वाची सांगता करण्यात आली. या महापर्वकाळात सर्वांनी उत्सवात सहभाग घेतल्याबद्दल सकल जैन संघातर्फे सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.