पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीचा सासरी छळ झाल्याच्या प्रकरणात गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना जामीन मंजूर झाला आहे. हे प्रकरण सध्या संपूर्ण पुण्यात गाजत असून, नुकत्याच समोर आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा गायकवाड बाप-लेक चर्चेत आले आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे वैष्णवी हगवणे यांचे मामा आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गायकवाड कुटुंबाकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा दावा गायकवाड यांचे वकील यांनी केला आहे.

गणेश आणि नाना गायकवाड कोण आहेत?
नाना गायकवाड हे पुण्यातील प्रभावशाली सावकार असून, त्यांचा मुलगा गणेश गायकवाड देखील त्यांच्या सावकारी व्यवसायात सहभागी आहे. हे दोघे अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. यामध्ये हुंडा छळ, धमकी, मारहाण, फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात एकूण १३ गुन्हे दाखल असून ३ वेळा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

२०१७ मध्ये गणेश गायकवाडचे लग्न राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुढे शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलगी मुक्तासोबत झाले होते. लग्नानंतर काही काळातच मुक्तावर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला, असा आरोप करण्यात आला. २०१८ मध्ये मुक्ताने पहिली तक्रार दाखल केली, तर २०२१ मध्ये तिने पुन्हा एकदा पोलिसांत धाव घेत गायकवाडांनी पेटवलेल्या सिगारेटचे चटके देत मारहाण केल्याची माहिती दिली होती. या तक्रारीनंतर गणेश आणि नाना गायकवाड यांना अटक झाली होती. गायकवाड यांचे वकील म्हणतात की, १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात तत्कालीन तुरुंग उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर भेटायला आले आणि त्यांनी जामिनासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गायकवाड कुटुंबाचे राजकीय पातळीवरही संबंध आहेत. नानासाहेब गायकवाड हे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. गायकवाड बाप-लेकांवर सावकारी प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्याने त्यांच्यावर तीनदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. येरवडा कारागृहात असताना इतर कैद्यांकडून नाना गायकवाड यांच्यावर हल्ला झाला, त्यामुळे त्यांना आणि गणेश गायकवाडला अमरावती कारागृहात हलवण्यात आले होते. सध्या गणेश आणि नाना गायकवाड न्यायालयीन कोठडीत आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील महिलांना अंतरीम जामीन देण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू असून, ५०० कोटींच्या खंडणीच्या आरोपासह एकूण प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले आहे.







