दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरातील भीमा नदी सद्या दुथडी भरून वाहत असून नदी काठी असणारे महादेवाचे मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. दौंड विसर्ग- गुरुवारी (ता. १५ ) सकाळी आठ वाजल्यापासून ३५ हजार ७४६ क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर ५००.३७ मीटर पाणी पातळी आजची आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने, भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
भीमा नदी ही दौंड शहराच्या हद्दीतून वाहते. भीमा नदीच्या पात्रात पाणी जास्त असल्याने नदी काठच्या शेतीला याचा फायदा होणार असून, येथील ओढे, विहीर, कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
धोक्याची पूर पातळी ५०५ मीटर दौंड शहरासाठी इशारा पूर पातळी ही ५०४ मीटर असून धोक्याची पूर पातळी ५०५ ( १५८२६४ क्यूसेक) मीटर आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात १ जून ते ऑगस्ट ३१ या कालावधीत सरासरीच्या १५८.९०% पाऊस पडला आहे. दौंड तालुक्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २१४. २० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तीन महिन्यात मिळुन ३४०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.