मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पुण्याच्या आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील याची पदोन्नती झाली असून त्याच्याकडे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी असणार आहे.
आज गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आता मुंबईचे आयुक्त असणार आहेत. वाहतूक पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे.
पुण्यातील आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली असून त्याच्या जागी पुण्याचे आयुक्त म्हणून रितेश कुमार कार्यभार स्वीकारणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावतीच्या आयुक्त आरती सिंग याची सशस्त्र पोलीस विभागात अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. आरती सिंग याची बदली करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले होते.