अजित जगताप
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील गोरख चिंच झाडाभोवती संरक्षक कवच उभारण्याची वृक्षप्रेमींनी मागणी केली आहे.
वाई तालुक्यातील वडाचे म्हसवे, पाचवड येथील गोरख चिंच हे अतिशय उपयुक्त व दुर्मिळ झाडांची निर्मिती असणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुणे विद्यापीठ व शिराळा येथील गोरख चिंच झाडाचे चांगले संवर्धन केले आहे. त्याच धर्तीवर पाचवड येथील झाडाचे संवर्धन व्हावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
गोरखचिंचचे शास्त्रीय नाव: अदानसोनिया डिजिटेटा , आफ्रिकन बाओबाब असे नाव आहे. आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे व आता उष्ण प्रदेशांत गोरख चिंच वृक्ष आहे. याच्या नऊ प्रजातींपैकी सहा फक्त मादागास्करमध्ये आढळतात. मायकेल ॲडनसन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो.
फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य एक हजार वर्षे असते. खोडे पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.
महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे.अशी माहिती उपलब्ध आहे. अशा या वृक्षाची जोपासना करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित यावे अशी अपेक्षा वृक्षप्रेमींच्या वतीने पाचवडचे सुपुत्र बाबासाहेब गायकवाड,पत्रकार विनीत जवळकर,दलित सेनेचे प्रेमानंद जगताप,रिपब्लिकन पक्षाचे कुणाल गडांकुश व अजित कंठे व मान्यवरांनी केली आहे.