सुरेश घाडगे
परंडा : परांडा तालुक्याला परतीच्या पावसाने रविवारी (ता.१६) झोडपल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील पाण्यातुन रस्ता शोधताना नागरीकांसह वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.
परांडा तालुक्यातील पिकांची तसेच रस्ते व पुलांची दुरावस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने उडीद, सोयाबीन, मका या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेला आहे . यामुळे शेतकऱ्याचे अर्थीक गणीत पुर्ण कोलमडल्याने ऐण सणासुदीच्या काळात शेतकरी हवालदीत होऊन सध्या शासनाच्या नुकसानभरपाई अनुदानासह विम्याचा मदतीची वाट पाहात आहे.
शहरात रविवारी दुपारी पावसाने झोडपले .दिवाळी सणामुळे गर्दीने गजबजलेल्या आठवडी बाजारामध्ये फळ-भाजी विक्रेत्यांची व दिवाळी बाजार करूंची मोठी तारांबळ उडाली. अनेकांचा भाजीपाला वाहत गेला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक मार्गावर रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले तर जुन्या तहसील मागे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.
दरम्यान, महाराणा प्रतापसिंह चौकात बावची मार्गावर पाणी साठले व गावात येणाऱ्या रस्त्यावरील स्मशानभुमी समोरही पाणी साठल्याने नागरीकांसह वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. या भागातुन शाळा, महाविद्यालय व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या विद्यार्थी, नागरीकांसह वाहानचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेले पाणी मार्गी लावण्यास प्रशासन असमर्थ ठरत आहे . त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. या साठलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, डास व किटकांचे प्रमाण वाढुन परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.