अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समाजभूषण स्व. संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर श्रीरंग ढमढेरे उपस्थित होते. ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी माहिती दिली. लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे याचबरोबरच गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापनेची माहिती या वेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती, अशी माहितीही ढमढेरे यांनी दिली.
क्रिडा शिक्षक झुरंगे यांनी क्रांतिकारकांनी देशासाठी दिलेले बलिदान व नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा डोईफोडे यांनी केले, तर आभार शालन खेडकर यांनी मानले.