लहू चव्हाण
पाचगणी : डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात केलेले भरीव कार्य सदैव स्मरणात राहील.अभ्यास आणि दर्जेदार वाचनाने माणूस राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे अब्दुल कलाम.असे प्रतिपादन भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी केले.
पाचगणी गोडवली (ता.महाबळेश्वर)येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते.यावेळी दैनिक ऐक्याचे तालुका प्रतिनिधी लहू चव्हाण, शिक्षक कुमार कांबळे, रमेश देशमुख, पुष्पलता माने, निलेश सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाले ‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो. युवक वाचतील तर देश वाचेल,अशी त्यांची खात्री होती. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खर्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाची माहिती कुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार लहू चव्हाण व मुख्याध्यापक शहाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ‘वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री’ या संकल्पना यावेळी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.
या कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पलता माने यांनी उपस्थित सर्वांना ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.