केडगाव / संदीप टूले : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरुद्ध केडगाव येथे मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.६) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शांततामय मार्गाने केडगाव बाजारपेठेत मोर्चा काढून मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
या हल्ल्याविरोधात घोषणाबाजी करून शासनाला जागे करण्यासाठी केडगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील एक नंबरची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव येथील मराठा बांधवांनी ‘केडगाव बंद’ची हाक दिली. या बंदला केडगाव येथील मुस्लिम, धनगर व ओबीसी तसेच इतर समाजातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला. तसेच या मोर्चामध्ये केडगाव व पंचक्रोशीतील असंख्य तरुणांनी ज्येष्ठांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
तसेच शिष्टमंडळाकडून केडगाव येथील ठाणेदारांना एक निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये व्यापारी बांधवांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी किरण देशमुख, तुषार शेळके, दत्तात्रय शेळके, झुंबर गायकवाड, दिलीप हंडाळ, निलेश मेमाणे, नितीन जगताप आदी मान्यवरांनी या निषेध मोर्चाला मार्गदर्शन केले.
मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा
केडगाव येथे ज्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्चामध्ये मुस्लिम, धनगर, माळी तसेच इतर समाजातील अनेक बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. या आंदोलनावेळी काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी पाण्याचे वाटप करत आपला पाठिंबा दर्शवला.