नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत: नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
काही दिवसांत लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर कमी करुन सर्वांना दिलासा दिला आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचे दर रक्षाबंधनच्या दिवशी कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले.
Xवर दिली दर कपातीची माहिती
X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”
मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या शक्ती, धैर्य आणि चिकाटीला सलाम केला आणि विविध क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. “आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते.”
यापूर्वी रक्षाबंधनानिमित्त सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील ३३ कोटी ग्राहकांना होणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात १० कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहेत. ही योजना १ मे २०१६ रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या अनुदानावर एकूण ६,१०० कोटी रुपये खर्च केले होते. योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली. हा दिवस महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.