विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर 5 दिवसीय कीर्तन सोहळ्याच्या भक्तीमय वातावरणात शुभारंभ
राजेंद्रकुमार गुंड
माढा – गुरू व साधू आपल्याला नेहमीच सन्मार्ग दाखवतात त्यामुळे त्यांच्या आज्ञेचे पालन करुन मनोभावे सेवा करावी परंतु दुर्दैवाने आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मनोरंजनाच्या युगात आज्ञाधारक व गुणी शिष्य दुर्मिळ होत असल्याची खंत परभणीचे ह.भ.प. माणिक महाराज रेंगे यांनी व्यक्त केली.
(कै.)आ.विठ्ठलराव भाऊ शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय संस्कृतिक मंडळ निमगाव (टें) व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर व झी टॉकीज यांचे संयुक्त विद्यमाने कारखाना स्थळावरील दत्त मंदिर प्रांगणावर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा शुभारंभाच्या किर्तनात बोलत होते.
सुरुवातीला विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन आमदार बबनराव शिंदे व त्यांच्या पत्नी कृषीभूषण सुनंदाताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन व शुभारंभ (कै.)आ.विठ्ठलराव (भाऊ) शिंदे यांच्या प्रतिमा व दीपप्रज्वलनाने आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे हभप माणिक महाराज यांनी सांगितले की, प्रपंच व परमार्थातील धन्यतेत खूप फरक आहे.प्रपंचात भरपूर संपत्ती व पैसा मिळाले की लोक धन्यता मानतात परंतु परमार्थात मात्र दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे व ईश्वराचे मनोभावे सेवा व भक्ती करण्यात धन्यता मानली जाते. जीवनात काही अनुभव प्रत्यक्ष घेता येत नाहीत व सांगता येत नाहीत मात्र साधुसंत भेटीचा अनुभव घेताही येतो व या जगाला सांगता येतो. ज्यांच्या डोळ्याला पांडुरंगाचे दर्शन झाले तो खऱ्या अर्थाने धन्य आहे. माणसाने आपले दुःख इतरांना सांगू नये कारण बरेचजण त्याचा अपप्रचार करुन आपल्याला दुःख व मानसिक त्रास देतात त्यामुळे दुःख नेहमी देवाला किंवा साधुसंतांना सांगावे. साधुसंतांची भेट झाली की माणसाचे प्रारब्ध बदलते, ज्ञान वाढते आणि मनात भक्तीभाव निर्माण होते. माणसाने मनोभावे भजन करीत आणि पंढरीची वारी करीत मरावे किंवा जनकल्याण व समाजसेवा करीत मरावे,नुसता स्वार्थ साधन्यात व प्रपंचात गुरफटून जावू नये.आई-वडीलांचे कष्ट व त्याग कधीच विसरू नका त्यांची सेवा करावी असे आवाहन केले.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे,कृषीभूषण सुनंदाताई शिंदे,जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, जिल्हा परिषद सदस्य अंजनादेवी पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे, शिवाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील, डॉ.जयंत करंदीकर, कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे, जनरल मॅनेजर सुहास यादव, पोपट यलपल्ले, प्राचार्य सुभाष नागटिळक, विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, पोपट चव्हाण, मोहन मोरे, दिलिप भोसले,वेताळ जाधव, शिवाजी डोके,विजय खटके महाराज,रमाकांत कुलकर्णी, नागनाथ खटके, यांच्यासह ग्रामस्थ व भाविक भक्त आणि कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.