प्रा. सागर घरत
करमाळा : ग्रामीण भागातल्या नागरिकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाकडून करोडो रूपये खर्च होत असताना घरतवाडी (ता. करमाळा, जि-सोलापूर) गावात या योजना पोहोचत नाही. रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत सुविधाच नसल्याने इथल्या गावकर्यांनी चक्क गावच विकायला काढल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
कुंभारगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली येणारे चारशे ते साडेचारशे लोकसंख्येचे घरतवाडी गाव. हे सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन व अनेकदा पाठपुरावा करूनही या गावाला डांबरी रस्ता नाही. या गावातील नागरिक, विद्यार्थी अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन, तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो. वैद्यकीय किंवा एखादा अघटीत प्रसंग घडल्यास या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. दोन ते अडीच किलोमीटर चा रस्ता पार करून कुंभारगाव ग्रामपंचायत पर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामस्थांना अर्धा तास वेळ घालवावा लागतो.
कुंभारगाव- घरतवाडी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून गावातील ग्रामस्थांनी चक्क पोस्टर बनवून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराबद्दल खेद व्यक्त केला असून घरत वाडी गाव हे विकायला काढले आहे, आणि प्रशासकीय यंत्रणेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घरतवाडीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. सोशल मीडिया वरती पोस्टर तुफान वायरल होत आहे . तसेच भविष्यात येणाऱ्या सर्वच निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा कठोर निर्णय गावातील युवक व ग्रामस्थांनी घेतला आहे. डीम्म पडलेले लोकप्रतिनिधी यांना आता तरी जाग येईल का? हा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामस्थांच्या व्यथा त्यांना कधी समजणार, आत्तापर्यंत मोठमोठ्या आश्वासनांचे फुसके बार हवेत सोडून घरत वाडी ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. अगोदर घरत वाडी- कुंभारगाव डांबरी रस्ता ,मगच प्रशासकीय सुविधा असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. लवकरात लवकर डांबरी रस्ता मंजूर न झाल्यास मोठे जन आंदोलन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्याचा इशारा घरतवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, गावात आरोग्याची कोणतीच सुविधा नसल्याने इथल्या ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. मात्र पावसाळ्यात एखादा रुग्ण गावाबाहेर नेण्यासाठी या गावकर्यांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढंच काय तर गंभीर रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेणं देखील शक्य नसल्यान अनेक रुग्णांना प्राण गमवावं लागल्याची खंत देखील गावकर्यांनी सांगितली आहे.
याबाबत बोलताना घरतवाडी येथील अनिकेत गायकवाड म्हणाले, गावकऱ्यांचा कोणाला विरोध किंवा दोष देण्याचा हेतू नाही. मात्र, या रस्त्याचा विकास होण्यासाठी सर्व घरतवाडी ग्रामस्थ एका छताखाली आले आहेत. गावाचा विकासासाठी सर्वांनी एकजूट केली असून डांबरी रस्ता होत नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना कुंभारगावचे सरपंच बंडोपंत पानसरे म्हणाले की, घरतवाडी येथील रस्त्याला गेल्या तीन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरी मिळाली होती. त्याचबरोबर या रस्त्यासाठी आमदार निधीतून काही रक्कम घेऊन विकास करण्याचे ठरले होते. मात्र सरकार बदलल्यामुळे या रस्त्याला स्थगिती मिळाली आहे.