अजित जगताप
सातारा : आपल्या सामाजिक बांधिलकीने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे खटावचे तहसिलदार किरण जामदाडे यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गोरेगाव वांगी ता खटाव येथील वाढीव गावठाण जमिनीवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्यासाठी शुक्रवार दि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील गावठाणाची गरज लक्षात घेऊन वाढीव गावठाणाची आराखडा तयार करून मंजूर करण्यात आला होता. आतापर्यंत त्याबाबत काही कारणास्तव पुढील काळात ठोस उपाययोजना व कारवाई होऊ शकली नाही. काही प्लॉटवर लोकांनी निवासी घरे बांधली आहेत. काही प्लॉट रिकामी आहेत. अशा प्लॉटचा सरकारी व बाजारभावाप्रमाणे जी रक्कम जास्त होईल. तशा पद्धतीने लिलाव पुकारण्यात येणार आहे. यातून एक कोटी रुपयांपर्यत शासकीय तिजोरीत रक्कम जमा होणार आहे.
गोरेगाव वांगी येथील उपलब्धता नुसार ४९,५०,५५,५६,५७ हे प्लॉटआहेत.त्यामधील काही प्लॉट मध्ये वहिवाट आहे. लोक घरे बांधून रहात आहेत. सध्या मोकळ्या जागेत सोयाबिन, घेवडा पीक आहे. लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच तहसिल कार्यालयात विविध प्रकारचे दाखले वितरित करणे, शिधा पत्रिका देण्यास प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे सामान्य लोकांची कामे जलदगतीने होत असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहेत.
गोरेगाव वांगी येथील वाढीव गावठाण मधील काही प्लॉट वगळून महसूल विभागाने सातारचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार किरण जमदाडे यांनी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांनी प्लॉटसाठी यापूर्वी पैसे भरले ते प्लॉटधारक वगळून अंदाजे १८ प्लॉटचा लिलाव केला जाणार आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी फलक व आवश्यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.या लिलावात एक कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.