पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) गैरप्रकार संबंधी चौकशी करण्यासाठी समिती गठण करण्याचे आदेश उपसचिव नि. भा. मराळे यांनी दिले असून या समितीच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस अँड. धर्मेंद्र खांडरे यांनी यासंबधी लेखी तक्रार दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती.
यात संचालकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधीचे पुरावे देखील यावेळी खांडरे यांनी सादर केले होते. या पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने या संबंधीची चौकशी करण्याचे आश्वासन खांडरे यांना दिले होते. यावेळी दूध संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे, शेखर शेटे, वरुण भुजबळ, प्रदिप पिंगट आदी उपस्थित होते.
यासंदर्भात आता प्रशासनाच्या वतीने समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने कात्रज डेअरीच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. पूर्वीच्या काही संचालकांवर आणि कर्मचाऱ्यांवर देखील कात्रज डेअरीने कारवाई केली होती. या संदर्भात प्रकरणात तक्रारीनंतर प्रशासन करवाईच्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहे.
प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये ५ जणांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्षपद नाशिकचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपुरकर यांच्याकडे देण्यात आले आहे. या समितीमध्ये सहकारी दुग्ध संस्था पुणेचे विभागीय उपनिबंधक महेश कदम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रेणी २ चे अनंत आढारी, लेखापरीक्षक श्रेणी २चे नितीन देशमुख व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. के. डोईफोडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
प्रशासनाने गठित केलेल्या समितीच्या नाशिकचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने सर्व गोष्टींची पडताळणी करून आपला अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे समितीला तातडीने सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवताना ही चौकशी पार पाडण्याचे आव्हान असणार आहे. वेळेत चौकशीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव नि. भा. मराळे यांनी दिले आहेत.