गणेश सुळ
केडगाव, ता.२१ : जिद्द, चिकाटी व त्याला प्रयत्नांची जोड व योग्य मार्गदर्शन असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, याचा प्रत्यय दौंड तालुक्यातील देलवडी या गावात पाहायला मिळाला. वडिलांनी शेती करत असताना मुलांना प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला अन् मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आज या एकाच कुटुंबात जवळपास तीन अधिकारी असून, वडील माझी सरपंच, थोरला भाऊ लोको पायलट, एक बहीण महनिर्मिती विभागात सहाय्यक अभियंता तर धाकटा भाऊ देखील महापारेषण विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे.
देलवडी येथील दत्तात्रय रशिवंत शेलार यांनी सरपंचपदी गावचे कामकाज तर जय मल्हार विद्यालयमधील स्कूल कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कामकाज केले आहे. साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्त्व. दोन मुले, एक मुलगी व पती-पत्नी असे त्यांचे पाच जणांचे कुटुंब. वडिलांची तळमळ बघून मुलं देखील त्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत.
वडिलांनी मुलांना लहानपणी दाखवलेली मोठी स्वप्ने मुलांनी पूर्ण केली असून, दत्तात्रय शेलार यांच्या मुलीने भाग्यश्री शेलार महानिर्मितीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून पोस्ट मिळवली आहे. तसेच गणेश दत्तात्रय शेलार याने भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) तर महेश दत्तात्रय शेलार हा महापारेषणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. या शेलार कुटुंबियातील तीनही मुले प्रशासकीय अधिकारी झाल्याने ‘अधिकाऱ्यांचे कुटुंब’ म्हणून या कुटुंबीयांकडे पाहिले जात आहे.
आजपर्यंत गावाने गेल्या काही वर्षांपासून शिक्षकाचे गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यात आणखी भर म्हणून शिक्षकाच्या गावात असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कुटूंब म्हणून शेलार कुटुंबाची नव्याने ओळख होत आहे. काबाडकष्ट करून शेती पिकवणारे दत्तात्रय शेलार यांनी आपल्या मुलांनी प्रशासकीय अधिकारी व्हावे असे स्वप्न पाहिलं आणि त्या झपाटलेल्या तीनही भावंडांनी प्रचंड मेहनत करत अखेर आपल्या वडिलाचे स्वप्न साकार केले. दौंड तालुक्यातील देलवडी गावातील या कुटुंबियांच्या जिद्दीचे परिसरात कौतुक केले जात आहे.