मुंबई : राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या पोलीस भरतीला प्रशासकीय कारणामुळे स्थगिती दिली असून पुढे ढकलण्यात आली आहे. असे आदेश महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथकाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत.
पुढील महिन्यात १४ हजार ९५६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आज शनिवारी (ता.२९) ला एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. तसेच पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असे परिपत्रकात सांगितले आहे.
दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५० जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६ जागा, भटक्या जमाती (ब)साठी ३७४ जागा, भटक्या जमाती (क) साठी ४७३ जागा, भटक्या जमाती (ड) साठी २९२ जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२ जागा, ओबीसींसाठी २ हजार ९२६ जागा, ईडब्ल्यूएससाठी १ हजार ५४४ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार ४६८ जागा; असे आरक्षण जाहीर आले होते.