नवी दिल्ली : स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने बॅटरी लो होणे ही सामान्य बाब झाली आहे. पण काही युजर्सना असा अनुभव येतो की जास्त वापर न करताही स्मार्टफोनची बॅटरी लो होते. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत त्याचा वापर केल्यास नक्कीच मोठा फरक पडू शकणार आहे.
जर तुमच्या फोनची बॅटरी खूप कमी वेळात संपत असेल तर तुम्ही फोनमध्ये छोटासा बदल करू शकता. तुम्ही अनावश्यक ॲप्स फोनमधून डिलिट करू शकता. अनेकदा फोनमध्ये अनावश्यक ॲप्स असतात जे तुमच्या बॅटरीचा सर्वाधिक वापर करतात. अशावेळी बॅटरी लगेच डाऊन होऊ शकते. हा छोटासा बदल केल्यास तुमच्या मोबाईच्या बॅटरीची लाईफ वाढू शकते.
तुमच्यापैकी बरेच लोक फोनचा ब्राईटनेस खूप जास्त ठेवत असतील तर ते आताच थांबवणं गरजेचे आहे. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय बदला. फोनमधील जास्त ब्राईटनेसमुळे बॅटरीचा वापर वाढतो, ज्यामुळे थोडासा वापर करूनही बॅटरी संपते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही फोनमध्ये ऑटो ब्राइटनेस मोड अॅक्टिव्ह करू शकता.
याशिवाय, तुम्ही तुमच्या फोनमध्ये कोणत्याही गरजेशिवाय मोबाईल इंटरनेट आणि वायफाय सुरू ठेवल्यास, बॅटरी लवकर संपते. तुमच्याकडूनही अशा चुका होत असतील तर तुम्ही त्यात बदल करू शकता. बरेच लोक रात्रभर मोबाईल इंटरनेट चालू ठेवतात, ही देखील एक मोठी चूक ठरते. त्याने बॅटरी लाईफवर परिणाम होऊ शकतो.