मुंबई – राज्यात महिन्याला १ लाख पदांसाठी मेगा भरती लवकरच होणार आहे. लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात एकूण दोन लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत. यामध्ये अ वर्गात ५० हजार, ब वर्गात ७५ हजार, क वर्गात १ लाख आणि ड वर्गात ५० हजार पदे रिक्त आहेत. रिक्त जागा आणि मंजूर जागांचा, आरक्षणाचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दर महिन्याला १ लाख कर्मचाऱ्यांना भरती केली जाणार आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात गृह विभागात १४ ते १५ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात २४ हजार (यातील ८ हजार पदांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे), जलसंपदा आणि महसूल विभाग प्रत्येकी १४ हजार, वैद्यकीय शिक्षण १२ हजार, सार्वजनिक बांधकाम ८ हजार आणि अन्य विभागांसाठी १२ हजार ५०० या संख्येत कर्मचारी भरले जातील. तसेच जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाईल.
याबाबत बोलताना मंत्रालय अधिकारी व कर्मचारी महासंघाचे प्रमुख ग. दि. कुलथे म्हणाले कि, नोकर भरती संदर्भात पावले टाकली जाणे आनंदाचे आहे. मात्र ‘भरती कंत्राटी पद्धतीने नको’ कंत्राटी कामगार फार जबाबदारीने काम करत नाहीत. त्यामुळे ही भरती नियमित प्रक्रियेनुसार व्हावी.