पुणे: भारतीय डाक विभागात तब्बल ४० हजार ८८९ रिक्त जागांसाठी लवकरच मेगा भरती सुरु होणार आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा उतीर्ण झालेल्या तरुणांसाठी पोस्ट खात्यात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये ब्रँच पोस्टमास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (एबीपीएम) पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
इंडिया पोस्ट जीडीएस जॉब नोटिफिकेशननुसार इच्छूक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म एडिट विंडो १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत खुली राहील. या भरतीप्रक्रियेंतर्गत महाराष्ट्रामध्ये २ हजार ५०८ जागा भरल्या जातील.
उमेदवारांसाठी पात्रता आणि अटी शर्ती पुढीलप्रमाणे
१) उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीच्या वर्गात गणिती आणि इंग्रजी शिकलेला असावा.
२) वय – किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षांपर्यंत
३) आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयामध्ये सवलत
४) अर्ज शुल्क – १०० रुपये
५) सर्व महिला, ट्रान्स वुमन आणि सर्व अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे.