सध्याच्या बैठी कामाच्या शैलीमुळे शारीरिक हालचालींना वाव मिळत नाही. किंबहुना ती न करण्यावरच जास्त भर दिला जातो. कारण, अगदी सहज उपलब्ध आहे ती गाडी मग दुचाकी असो वा कार. यापूर्वी सायकलींचा वापर केला जात होता. त्यामुळे शारीरिक हालचाल होत होती. त्यात ऑफिसमधून एकाच जागी बसून असलेले काम. यांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम केल्यास अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यात फुफ्फुसाचा आजारही बळावू शकतो. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे होऊ शकते. त्यात ऑफिसमध्ये व्हेंटिलेशनचा अभाव धोकादायक ठरू शकतो. बहुतेक ऑफिसमध्ये एअर कंडिशनर असतो. त्यामुळे ताजी हवा येणे बंद होते. घरातील हवा बाहेर जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, श्वासोच्छवासाच्या संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय फुफ्फुसांना दीर्घकालीन नुकसान देखील होऊ शकते.
घरातील हवा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरावर तात्काळ परिणाम घडवू शकतात, ज्यामुळे डोळे, नाक आणि घसा जळजळ, डोकेदुखी, चक्कर येणे, दमा किंवा श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या रूग्णांमध्ये, घरातील प्रदूषणामुळे लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने दिसून येऊ शकते.