युनूस तांबोळी
शिरूर : काबाडकष्ट करणाऱ्या महिला असो की नोकरवर्गीय महिला त्यांना या ना त्या कारणाने कष्ट करण्याची सवय होवून गेलेली असते. त्यामुळे त्या येणाऱ्या आरोग्याच्या समस्या अंगावर काढत असतात. खरे तर आरोग्याच्या समस्यांसाठी तातडीने आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक असते. त्यांच्या या आतेतायी पणामुळे आजार बळावत जातो. त्यातून मोठ्या व्याधीना सामोरे जावे लागते. पण याच आरोग्याच्या समस्यांसाठी योग्य वैद्यकिय सल्ला घेतला तर योग्य वेळी योग्य आजाराचे निदान होते. यातून आरोग्याची समस्या जाणवत नाही. मात्र महिलाच आजाराकडे कानाडोळा करत असल्याने वेगवेगळ्या आजारांना सामोरे जात आहेत.
जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी वेगवेगळे कक्ष उभारून प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यानूसार जुई आंतर रूग्णकक्ष, मोगरा प्रसुती गृह, कमळ शस्त्रक्रिया गृह, प्रजक्ता लेबोरेटरी गृह, अबोली संगणक कक्ष, हिरकणी कक्ष अशा प्रकारे रूग्णासाठी सुवीधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानूसार प्रत्येक रूग्णाची काळजी घेतली जाते. औषध भंडारातून प्रत्येकाला मोफत औषध पुरविण्याचे काम केले जाते. प्रत्येक महिण्याला महिलांची तपासणी तसेच वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांना सुवीधा पुरविल्या जातात. यासाठी जिल्हा परिषदेने आशा, अंगणवाडी सेवीका व मदतनीस यांच्या मार्फत वेगवेगळ्या सुवीधा पुरविल्या जातात.
महिलांच्या प्रसुतीपुर्वी पासून ते बाळाच्या संगोपणा पर्यंत काळजी घेण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र घेत असते. यासाठी जिल्हा परिषदेने रूग्णवाहिकेची सुविधा देखील पुरवली आहे. वेगवेगळ्या सुवीधा मार्फत महिलांच्या आरोग्याची काळजी येथे घेतली जाते. रक्त तपासलणी, मधुमेह तसेच रक्तदाब, नेत्रतपासणी यासाठी विशेष प्राजक्ता लेबोरेटरी गृह उभारला असून या तपासणीतून महिलांच्या वेगवेगळ्या आजाराबाबत समस्या जाणून त्याच्यावर निदान केले जात आहे.
लहान बाळांना दिले जाणारे डोस किंवा पोलिओ डोस यासाठी योग्य नियोजन केले जाते. त्यातून बाळाला सुजृढ राहण्यासाठी सल्ला देखील दिला जातो. माता बालक यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळेचे व मार्गदर्शनाचे नियोजन केले जाते. त्यासाठी तज्ञ वेद्यकिय अधिकारी यांचा सल्ला मातांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. शासनाच्या वतीने येणारे अनेक उपक्रम नेहमी आरोग्य केंद्रात राबविले जातात. यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. लोकसंख्या वाढीसाठी मार्गदर्शन देऊन ती नियंत्रणात ठेवण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. प्रत्येक आरोग्य केंद्रात ठरावीक दिवशी या शस्त्रक्रिया होत असतात. त्यासाठी मोफत शस्त्रक्रिया व रूग्णांना घरपोच सोडविण्याचे काम केले जाते.
दैनदिन आरोग्याच्या सुवीधा पुरवित असताना प्रत्येक रूग्णांची तपासणी व औषध पुरवित असताना त्या प्रमाणे रूग्णांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राकडे वाटचाल होणे आवश्यक आहे. मुख्यतः महिलांच्या आरोग्यासाठी या आरोग्य केंद्रात वेगवेगल्या सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे महिलांनी वेगवेगळ्या तपासणी साठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडेच गेले पाहिजे.
महिलांच्या आरोग्या बाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात योग्य काळजी घेतली जाते. प्रसुती साठी योग्य नियोजन करण्यात येत असल्याने शिवाय रूग्णवाहिकाची सुवीधा पुरवली गेली आहे. योग्य औषधांचा पुरवठा व वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सल्ला यामुळे महिलांच्या आरोग्याची तपासणी होते. यासाठी प्रबोधन होऊन महिलांनी आरोग्य केंद्राकडे वळाले पाहिजे. (विद्या लोखंडे अधिपरीचारीका प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाई ता. शिरूर)
हिमोग्लोबीन, रक्तदाब, मधुमेह यासारख्या तपासणी आता मोफत होऊ लागली आहे. या तपासणीवर पुढील आरोग्याच्या समस्यांची तपासणीतून योग्य आजाराचे निदान होते. त्यामुळे मोफत सुवीधा असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे हे महिलांसाठी योग्य आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याची काळजी घेत असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे. (केशर पानगे अधिपरिचारीका प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाई ता. शिरूर)