पुणे: निसर्गाचे मनमोहक रूप, रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा सुगंध आणि थंडगार हवा यांचे सुंदर मिश्रण म्हणजे पावसाला होय. पण या आल्हाददायक वातावरणासोबतच अनेक आरोग्यविषयक आव्हानेही येतात. वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गामुळे पोटाचे विकार, सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशावेळी आपलं अन्नपाणी कसं असावे, याबद्दल योग्य माहिती असणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती काहीशी मंदावते, असं आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्हीही सांगतात. त्यामुळे या काळात पचायला जड असलेले पदार्थ टाळणं महत्त्वाचं आहे. भजी, वडे, समोसे यांसारखे तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ पचायला जड असतात आणि ब्लोटिंग, ॲसिडिटीची समस्या निर्माण करू शकतात. नेहमी गरम आणि ताजे शिजवलेले अन्न खा. शिळे अन्न किंवा बाहेरचे पदार्थ टाळा. सूप, खिचडी, गरम भात आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. जेवणात आले, लसूण, जिरे, धणे यांसारख्या पदार्थांचा वापर करा. हे पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?

पावसाळ्यात विषाणू आणि जिवाणूंचा संसर्ग वाढतो, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे.
- लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी व्हिटॅमिन ‘सी’ युक्त फळे खा. व्हिटॅमिन ‘सी’ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
- दुधात हळद घालून प्या किंवा जेवणात हळद आणि काळी मिरीचा नियमित वापर करा. यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
- सकाळी तुळस, आलं, गवती चहा घालून केलेला गरम काढा किंवा चहा प्या. हे सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यास मदत करेल.
या काळात भाज्या आणि फळांची निवड करताना विशेष लक्ष द्यावे लागते. पालेभाज्यांमध्ये (पालक, मेथी, कोथिंबीर) पावसाळ्यात किडे आणि जंतू असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्या शक्यतो टाळाव्यात किंवा अतिशय स्वच्छ धुऊन व वाफवून खाव्यात. दुधी भोपळा, दोडका, पडवळ, कारले यांसारख्या भाज्या खाणे जास्त सुरक्षित असते. सफरचंद, डाळिंब, पेरू, केळी यांसारखी फळे खा. पण, ती नेहमी स्वच्छ धुऊन खावीत.
पावसाळ्यात पाण्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते, कारण दूषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात. पिण्यासाठी नेहमी उकळून थंड केलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. साध्या पाण्याऐवजी तुम्ही गरम हर्बल टी, जिंजर टी किंवा गरम सूप पिऊ शकता. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही या सुंदर ऋतूचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. आपल्या आहारात योग्य बदल करून, तुम्ही संसर्ग आणि आजारांपासून दूर राहू शकता.







