जेव्हा आपल्या शरीरामध्ये क्रोमियमची कमतरता असते, तेव्हा इन्शुलिन प्रतिरोध होऊ शकतो. ज्यामुळे प्री-डायबेटीस किंवा डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. रूग्णांना अनियंत्रित डायबेटीस असल्यास, क्रोमियम समृद्ध अन्न डायबेटीसवरील रामबाण उपाय होऊ शकते आणि इन्शुलिनची गेलेली संवेदनशीलता परत मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
क्रोमियम म्हणजे नेमकं काय?
क्रोमियम हा एक असा धातू आहे जो आपल्या शरीरामध्ये तयार होत नसल्यामुळे तो आहारामधून घ्यावाच लागतो. अशा धातूंना आवश्यक धातू (इसेंशिअल मिनरल) असे म्हटले जाते. क्रोमियमच्या इतर महत्वाच्या कार्यासोबतच ‘इन्शुलिनची संवेदनशीलता’ कार्यरत ठेवणे हे सर्वात महत्वाचे कार्य आहे. यासोबतच मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, ग्लुकोज, फॅट आणि कोलेस्टेरॉलची चयापचय क्रिया वाढवते. वयानुसार एका दिवसामध्ये आहारामधून फक्त 25 ते 30 मिलिग्रॅम एवढेच क्रोमियम जास्त असलेल्या पदार्थांची आवश्यकता असते.
क्रोमियम हे ग्लुकोजच्या चयापचय क्रियेमध्येही मदत करत असते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये क्रोमियमची कमतरता असते, तेव्हा इन्शुलिनची संवेदनशीलता जाऊन ‘इन्शुलिन प्रतिरोध’ होऊ शकतो, ज्यामुळे प्री-डायबेटीस किंवा डायबेटीस (मधुमेह) होण्याची शक्यता वाढते.
इन्शुलिनची संवेदनशीलता जाणे म्हणजे काय?
जेव्हा आहारामध्ये कर्बोदक पदार्थांचे म्हणजेच भात, गहू आणि गव्हाचे पदार्थ, मैदा, आणि मैद्याचे पदार्थ, साखर, बेकरीचे पदार्थ यांचे सेवन केले जाते, तेव्हा पॅनक्रियाजमधील (स्वादुपिंड) बीटा पेशी इन्शुलिनचे स्त्रवण करुन हे इन्शुलिन मग ग्लुकोजच्या पचनक्रियेमध्ये सहभागी होते. परंतु, जेव्हा आहारामध्ये साखर, गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ या प्रकारच्या तंतुमय कमी किंवा नसलेल्या पदार्थांचे सेवन सतत आणि जास्त प्रमाणात केल्यास पॅनक्रियाजमधील (स्वादुपिंड) बीटा पेशींचे नुकसान होऊन त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो आणि मग इन्शुलिनचे कार्य व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मग डायबेटीसची (मधुमेह) सुरुवात होते.
क्रोमियम जास्त असलेले पदार्थ कोणते?
रूग्णांना अनियंत्रित डायबेटीस (मधुमेह) असल्यास, क्रोमियम समृद्ध अन्न डायबेटीसवरील रामबाण उपाय होऊ शकतो आणि इन्शुलिनची गेलेली संवेदनशीलता परत मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ‘डायबेटीस केअर जर्नल ऑफ अमेरिकन डायबेटीस असोशिएशन’ यासारख्या जर्नलमध्ये (शोधनिंबधक) आणि बर्याच जर्नल्समधील अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे की, क्रोमियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास किंवा त्याचे सप्लिमेंट घेतल्यास डायबेटिसवर नियंत्रण येऊ शकते आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य होऊ शकते.
क्रोमियम समृद्ध असलेले पदार्थ रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास इन्शुलिनची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. यामध्ये राजगीरा, बाजरी, नाचणी, जव, पोहे, मेथीची पाने, राजगिराची पाने, मुळ्याची पाने, अंबाडीची भाजी, कांद्याची पात, हिरवा टोमॅटो, मेथी दाणे, पनीर, तसेच मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता यांसारखे फोडणीचे पदार्थ यांचा आहारामध्ये शक्य तितका जास्त प्रमाणात वापर केल्यास इन्शुलिनची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होण्यास चालना मिळते.
यासोबतच दालचिनी+तमालपत्र+लवंग+मिरे+हळद हे जिन्नस घालून तयार केलेला आयुर्वेदिक काढा आणि गरम पाण्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे यासारखे जिन्नस घालुन तयार केलेला आयुर्वेदिक फांट हेसुद्धा क्रोमियमचे प्रमाण त्यामध्ये जास्त असल्यामुळे संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. यामधील फक्त राजगिरा, पनीर, पोहा, मेथी, मुळ्याची पाने, कांदापात यापैकी कोणताही पदार्थ दिवसातून एकदा खाल्ला तरी दिवसाला जेवढी क्रोमियमची गरज आहे तेवढे मिळून जाते.
जर रक्तातील साखरेची पातळी 250 पेक्षा जास्त असेल तर उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी क्रोमियमचे सप्लिमेंट फायदेशीर ठरतात. पण ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. मी दररोजच्या उपचारांमध्ये हे क्रोमियम समृद्ध पदार्थ किंवा सप्लिमेंट वापरते आणि यामुळे चांगले परिणाम मिळतात.
यासोबतच व्यायाम, बाकी पथ्य पाळणेही तितकच आवश्यक आहे. या क्रोमियममुळे इन्शुलिनची संवेदनशीलताला चालना मिळते. यामुळे डायबेटीस (मधुमेह) बरा होत नाही किंवा हा डायबेटीस (मधुमेह) वरील उपाय नाही.
– डॉ. स्वाती खारतोडे, संशोधक आणि वैद्यकीय आहारतज्ञ, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर (पुणे)