संतोष गायकवाड
Wagholi News : वाघोली (पुणे) : वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास एक विशेष बाब म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. याठिकाणी ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली असताना ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. (Wagholi News)
ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास एक विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाकरिता विहीत पध्दतीने जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल. असे आदेश आरोग्य
दरम्यान, वीस दिवसापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली असतानाच आता ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले जाणार असल्याने वाघोलीसह परिसरातील गावांच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. (Wagholi News)
वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पीटल व ट्रॉमा सेंटर सुरु करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे म्हणाले, “शासन स्तरावर यासाठी प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरू होता. पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद फाटा येथे सिव्हिल हॉस्पीटल व ट्रॉमा सेंटर सुरु केल्यास निश्चितपणे वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणाऱ्या सर्वच रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे.” (Wagholi News)