लोणी काळभोर, (पुणे) : सर्व नागरिकांना त्वरित, आधुनिक आणि गुणवत्ता पूर्वक परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे या भूमिकेतून विश्वराज हॉस्पिटल मागील ६ वर्षे कार्यरत आहे. “आजपर्यंत आपणास रुग्णसेवेत मिळालेले यश हे केवळ आणि केवळ गुणवत्ता आणि समर्पणाच्या संस्कृतीतून मिळाले असल्याचे प्रतिपादन विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांनी केले.
लोणी काळभोर (त. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटल येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन हॉस्पिटलच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ आणि अधिकारी वर्ग यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करताना कराड बोलत होत्या.
विश्वराज हॉस्पिटल ही पूर्व हवेली मधील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा पुरवण्याच्या हेतूने डॉ. अदिती कराड यांच्या उत्कटतेतून जन्मलेली चळवळ आहे. डॉ. अदिती कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विश्वराज हॉस्पिटलचा आपल्या परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी निर्धारपूर्वक प्रवास सुरू आहे.
प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, त्यांना ओळखणे आणि विशेषत: आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येच्या क्षमतेचा उपयोग करून आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सक्रियपणे कार्य करणे महत्वाचे आहे. सध्याच्या आधुनिक युगात उपचारक्षेत्रात येऊ घातलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उपचारपद्धती परिसरातील सर्वसामान्य वर्गाला उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे.
विश्वराज हॉस्पिटल मध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी तसेच रिनल ट्रान्सप्लांट (किडनी प्रत्यारोपण), आय वि एफ (कृत्रिमरीत्या गर्भधारणा) सारखे अद्ययावत उपचार यशस्वीरीत्या सुरु आहेत. समृद्ध समाज, विकसित राज्य आणि बळकट अर्थव्यवस्था असणाऱ्या देशासाठी नागरिकांचे निरोगी राहणे हे अत्यंत आवश्यक असल्याचेहि कराड म्हणाल्या.
दरम्यान, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड याच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त दि.३ फेब्रुवारी ते दि. ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य आरोग्य शिबीर आयोजित करत असल्याचे जाहीर केले. सदर शिबिरात नामवंत चॅरिटेबल संस्थेच्या साहाय्याने ECG ,BMI, BSL यांसारख्या प्राथमिक तपासणी विनामूल्य करणार असून, स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी कन्सल्टेशन केवळ रु. १०० मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच विविध तपासण्यांवरती व ठराविक शस्त्रक्रियांवरती ४०% पर्यंत सूट देण्यात येणार आहे.