हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बँकेचे एटीएम मशीन फोडुन फरार असलेल्या दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजय रामचंद्र ठवरे (वय – २१ रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली), सुमित दिलीप बलगाडे (वय २०, रा. पीएमटी बस स्टॉपचे मागे, पाटीलवस्ती, ऊरुळी कांचन ता हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सोनाई हॉटेलच्या शेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम गुरुवारी (ता. ०३) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फोडले असल्याची घटना होती.
याबाबत सिक्युरीटी कंपनीचे झोनल मॅनेजर श्री कृष्णा काशीनाथ गोळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने घटनेचा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर घटनेचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई दिपक सोनवणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा ऊरुळी कांचन शिंदवणे चौक येथे येणार आहे.सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकाने सदर ठिकाणी जाऊन शिंदवणे चौक येथे सापळा रचला. त्यावेळी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
दरम्यान , पोलीसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्याने अजय ठवरे असे नाव सांगतिले. तसेच सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार सुमित बलगाडे याच्या समवेत केला असल्याचे पोलीसांना सांगितले.पोलीसांनी तत्काळ सुमित बलगाडेलाही ताब्यात घेतले दोन्ही आरोपींनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
सदरची कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देवीकर, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, दिपक सोनवणे, निखील पवार, बाजीराव वीर यांचे पथकाने केली आहे.