पुणे : योग हा प्रकार मानवी शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशी मानला जातो. जगात कित्येक ठिकाणी योग शिबीरं घेतली जातात. योगाचे कोर्सेस सुधा उपलब्ध आहेत.आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरूवात 2015 मध्ये झाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे. यावर्षी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगा दिनाची थीम ठेवली आहे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या दिवसाला मोठे महत्व देखील आहे. योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे असते. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे.
27 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विशेष म्हणजे त्याचवर्षी 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला. हेच नाही तर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केली.
21 जून 2015 हा दिवस जगभरात सर्वात पहिल्यांदा योगा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. या दिवशी जगभरातून लाखों लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला त्यावेळी सुमारे 177 देशांचा पाठिंबा दिला होता. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाची खास थीम ठरवली जात असते. यावर्षी योगा दिनाची थीम ही महिलांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन 2024 ची थीम ‘महिला सशक्तिकरणसाठी योग’ अशी आहे. दरवर्षी काहीतरी वेगळा संदेश देणारी थीम आंतरराष्ट्रीय योगा दिनाची असते.