वाढतं वजन ही अनेकांची समस्या बनलेली असते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात व्यायामासह योगासनं करणे फायदेशीर ठरू शकते. याच योगासन करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास अवघ्या महिनाभरातच फरक दिसू शकेल.
नौकासन हा एक योगासन प्रकार फायदेशीर ठरू शकतो. नौकासनाचा सराव केल्याने पोटाच्या स्नायूंना टोन करता येतो आणि कमरेभोवती जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे शरीराचा मधला भाग मजबूत होतो आणि पोट आणि कंबर सडपातळ होते. नौकासन करण्यासाठी, तुमच्या पाठीवर झोपा आणि हळूहळू तुमचे पाय आणि शरीराचा वरचा भाग वर करा. हे शरीराला बोटीप्रमाणे व्ही आकारात आणेल. 20-30 सेकंद या स्थितीत राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या. हे आसन 3-4 वेळा करा.
भुजंगासन हा देखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. हे आसन पोटाच्या स्नायूंना टोन करते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. या आसनामुळे पाठीचा खालचा भागही मजबूत होतो. भुजंगासनाचा सराव करण्यासाठी पोटावर झोपा आणि हात खांद्याच्या खाली ठेवा. हळूहळू डोके आणि छाती वर करा. शरीराला नागाचा आकार द्या. काही सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर पूर्वपदावर या. याने फायदा होऊ शकते.