युनूस तांबोळी
शिरूर : फेब्रुवारी पासूनच कडक उन्हामुळे शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. सध्या तापमानाचा पारा ३२ ते ३५ पार झाला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा वाढत असून, अधिक वेळ उन्हाचा सामना करावा लागल्यास अशा वेळी शरीरात निर्जलीकरण, डिहायड्रेशन, अतीथकवा, किंवा उष्माघाताचा त्रास उध्दभवतो, अशा वेळी प्रथमोपचार करणे आवश्यक ठरते. त्यानंतर ही त्रास जाणवू लागल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. असे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॅा. नामदेव पानगे यांनी सांगितले.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच जास्त ऊन वाढले आहे. तापमान ३२ ते ३५ अंशाच्या जवळ पोहचले आहे. यावरून पुढील महिने उष्णतेचे कसे जाणार याचा अंदाज येतो. राज्यातील तापमानात काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. असे सांगण्यात येत आहे.
उष्माघाताची लक्षणे…
उलटी होणे
चक्कर येणे
मळमळ होणे
शरीराचे तापमान खूप वाढणे
पोटात कळा येणे
शरीरातील पाणी कमी होणे
पाय दुखणे, जड होणे
चेहरा लाल होणे
रक्तदाब वाढणे
अशक्तपणा व त्वचा कोरडी पडणे
कधी होतो उष्माघात…
उष्माघाताचा धोका सर्वाधिक दुपारच्या वेळेत असतो. यामुळे शक्यतो दुपारी बारा ते तीन दरम्यान उन्हात बाहेर पडू नये. सातत्याने पाणी पीत रहावे, तसेच गॅागल, छत्री, टोपी घालावी किंवा पांढऱ्या रंगाचा सुती रूमालाने डोके झाकावे. उन्हाळ्यात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कष्टाची कामे टाळावी, अनावश्यक समारंभ टाळावेत, तहान नसतानाही वारंवार पाणी प्यावे, तीव्र चक्कर येणे, मळमळ उलटी होणे यासारखी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावा.
– डॅा. दत्तात्रेय डुकरे
समर्थ व्हास्पिटल आणि चिंतामनी बेबी केअर जांबूत ता. शिरूर
उष्माघात झालेल्या व्यक्तीने थंड सावलीच्या ठिकाणी झोपावे. कपाळावर ओल्या कापडाची घडी ठेवावी. ओल्या कापडाने त्याचे शरीर पुसावे. बाधित व्यक्तीला ओआरएस किंवा लिंबू सरबत द्यावे. वैद्यकिय सल्ला घेण्यासाठी डॅाक्टरांशी संपर्क साधावा. मेहनतीची कामे उन्हात करू नये. या काळामध्ये चहा कॅाफी, कृत्रीम थंड पेय घेणे टाळावे. चांगला प्रथिनेयुक्त सकस आहार घ्यावा. व शिळे अन्न खाणे टाळावे. ताक, लस्सी, लिंबू सरबत व घरगूती पेय घ्यावीत.
डॅा. खंडू फलके
ओम क्लिनीक जांबूत ता. शिरूर