देशात 2019 च्या अखेरीस कोरोना व्हायरसने जी सुरुवात केली होती त्याने फक्त भारतच नाहीतर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होता. त्यानंतर आता एक आणखी घातक रोग येत आहे. हा देखील एका विषाणू अर्थात व्हायरसमुळेच होत आहे. मारबर्ग विषाणू असे याचे नाव आहे. हा रोग अत्यंत घातक मानला जातो. आफ्रिकेतील काही भागात उद्रेक झाला आहे.
मारबर्ग व्हायरसला ‘व्हायरल हेमोरेजिक फिव्हर’ देखील मानले जाते. हा विषाणू रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि रक्तस्त्राव होतो. यामुळेच ते धोकादायक मानले जाते. बऱ्याच कारणांमुळे मारबर्ग विषाणू आणि त्यामुळे होणारे रोग कोरोना संसर्गापेक्षा धोकादायक मानले जातात. जरी त्याची लक्षणे फ्लू आणि कोरोनासारखी सुरू होतात. परंतु, वेळेवर उपचार न मिळाल्याने तो गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका जास्त असू शकतो.
अशी आहेत याची लक्षणे
संसर्गाच्या सुरुवातीला ताप, थंडी वाजून येणे, तीव्र डोकेदुखी-खोकला, स्नायू किंवा सांधे दुखणे, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवतात. संसर्गाची तीव्रता वाढल्याने उलट्या, जुलाब, नाक-तोंडातून रक्त येणे, डोळे, फोड येणे किंवा त्वचेवर पुरळ येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मृत्युदरही चिंतेचा विषय
मारबर्ग विषाणू हा कोरोना आणि अलीकडे पसरणाऱ्या इतर अनेक संसर्गजन्य रोगांपेक्षा धोकादायक मानला जात आहे. मारबर्ग सामान्यतः प्राणघातक आहे, सरासरी मृत्यू दर सुमारे 80% आहे. सध्या कोविड-19 मुळे मृत्यूचा धोका 2.7 ते 4 टक्क्यांच्या दरम्यान आहे.