पाणी हे जीवन मानले जाते. कोणताही प्राणी किंवा मानव त्याशिवाय जगू शकत नाही. आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आरोग्याच्या समस्या टाळता येऊ शकतात.
शरीर हायड्रेटेड राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. प्रौढ व्यक्तीला दिवसातून सुमारे 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. व्यक्तीच्या हालचाली, हवामान आणि आरोग्य स्थिती यावर अवलंबून असू शकते. उन्हाळ्यात जेव्हा जास्त घाम येतो तेव्हा पाण्याची गरज वाढते. त्याचवेळी, थंड हवामानात लोकांना कमी तहान लागते, ज्यामुळे ते कमी पाणी पितात, जे शरीरासाठी हानिकारक असू शकते.
तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला आरोग्याची समस्या जाणवू शकते. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, जे शरीरासाठी गंभीर आहे. डिहायड्रेशनमुळे हृदयविकार, यकृताचे आजार आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होऊन गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात. पुरेशा प्रमाणात पाणी न पिल्यानेही शरीरात विषारी पदार्थ जमा होतात.
कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. पाण्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित राहते आणि त्याच्या कमतरतेमुळे स्टोन तयार होऊ शकतात. मूत्रपिंड शरीरात गाळण्याचे कार्य करते, म्हणून ते हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे असते.