मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याची काळजी कशी घ्यावी याचा विचार अनेकदा केला जातो. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा मात्र काय करावं, काय काळजी घ्यावी हे बऱ्याचदा समजत नसते. त्यातच नवजात बालकांना सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध आणि सहा महिन्यानंतर काही पदार्थ देण्याचा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. त्यात लहान बाळांमध्ये फूड अॅलर्जी होणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र, त्याकडे विशेष लक्ष देणे ही गरज बनली आहे.
अॅलर्जी कोणत्या पदार्थ अथवा गोष्टींची होईल हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांचा आहार ठरलेला असतो. त्यांना काही खास पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, काहीवेळा या पदार्थांमुळे अॅलर्जी होऊ शकते. लहान मुलांना शेंगदाणे, मासे, काजू, बदाम, अंडी, गहू, सोयाबीन, तीळ यांपासून अॅलर्जी होऊ शकते.
जर तुमच्या लहानग्यांना एखाद्या पदार्थांमुळे फूड अॅलर्जी होत असेल तर तत्काळ डॉक्टराशी संपर्क साधायला हवा. ज्या खाद्यपदार्थाचा त्रास बाळाला होतो, तो खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो आणि नियमित दिनचर्येतून तो पदार्थ बाजूला ठेवला जातो. तसेच मुलांना अँटीहिस्टामाइनचे औषध दिले जाते.
ही असू शकतात लक्षणे…
फूड अॅलर्जीच्या काळात मुलांत उलटी येणे, मळमळ होणे, पोटदुखी, स्कीन अॅलर्जी, श्वास घेण्यास त्रास, गॅस, अपचन, तोंडाखाली खाज सुटणे, सतत शिंका येणे, ओठाजवळ जडपणा जाणवणे आदी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे.