आपण आपल्या आरोग्याकडे नेहमी लक्ष देतो. आजाराचं कोणतंही लक्षण दिसल्यास लगेच उपचाराला प्राधान्य देतो. पण, आरोग्याकडे लक्ष देताना डोळ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे. कारण, जर डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे डोळ्यांची नियमित फायद्याची ठरू शकते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमित तपासणीची सवय लावली पाहिजे, असे नेत्रतज्ज्ञ सांगतात. वाढत्या वयानुसार, दर सहा महिन्यांनी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीदोष यांसारख्या समस्या वेळीच ओळखता येतात. डोळ्यांच्या समस्यांचे वेळीच निदान झाल्यास गंभीर समस्या आणि अंधत्व या उपचारातून टाळता येऊ शकते.
जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्यासाठी ते हानीकारक ठरू शकतं. धूम्रपान हे डोळ्यांना सर्वाधिक नुकसान करणारी सवय मानली जाते. धूम्रपानामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे रक्तदाब वाढण्याचा धोकाही असतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही सवय सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. मधुमेही रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका असतो, ज्यामुळे डोळ्यातील पडदा आणि डोळ्यांच्या इतर पेशींना नुकसान होऊ शकते. मधुमेह आणि रक्तदाब या दोन्हींचा धोका वाढत्या वयाबरोबर वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्यास दृष्टी कमजोर होण्यापासून रोखता येते.