पुणे : करोनावरील उपचारांबाबत पुण्यातील शुभंकर अंबिके यांनी लिहिलेला शोधनिबंध ऑक्सफर्डच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
अंबिके यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात करोना संसर्गाचे संकट संपूर्ण ताकदीने रोखण्यासाठी शरीरात तयार होणारी करोना विषाणू आरएनएची निर्मिती रोखण्याची गरज अधोरेखित करणारे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या न्यूक्लिईक अॅसिड रिसर्च या संशोधन पत्रिकेकडून घेण्यात आली आहे.
शुभंकर अंबिके यांनी माध्यमिक शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण मॉडर्न महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआव्ही) येथे घेतले आहे. आणि सध्या ते सध्या जर्मनीतील टेक्निकल युनिवर्सिटी ऑफ म्युनिक येथे डॉ. उलरिके प्रॉट्झर यांच्या मार्गदर्शनाखाली विषाणू विज्ञान या विषयात पीएच. डी. करत आहेत.
मानवी शरीर हे कोट्यवधी पेशींनी तयार झाले आहे. प्रत्येक पेशीत असलेल्या डीएनएमध्ये प्रथिने आणि शरीराची निर्मिती करणारे इतर आवश्यक रेणू तयार करण्याच्या सूचना असतात. पेशींद्वारे या घटकांची निर्मिती करण्यासाठी असलेल्या या सूचना म्हणजे आरएनए होय. पेशींद्वारे प्रथम डीएनएपासून आरएनए रेणू बनवतात. करोना विषाणूकडे मात्र हे आरएनए रेणू तयार असतात.
मानवी शरीराला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर विषाणू शरीरातील आरएनए प्रतिलेखांचा वापर करतात. आणि स्वत:च्या आरएनएच्या लाखो प्रती निर्माण करतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी शरीरातील प्रथिनांचा वापर करतो. हे रोखण्यासाठी आण्विक कात्रीचा वापर केला असता विषाणू अवरोधक औषधांची निर्मिती आणि मानवी शरीरातील विषाणूचा प्रसार थांबवणे शक्य होईल. असे अंबिके यांनी त्यांच्या शोधनिबंधातून संगोतले आहे.
दरम्यान, अंबिके यांनी केलेल्या संशधनानुसार एसआय आरएनए पद्धतीचे उपचार केल्यानंतर फुप्फुसाच्या उतींमध्ये विषाणूच्या पातळीत ९३ टक्के एवढी घट दिसून आली आहे. अंबिके यांचे हे संशोधन आगामी काळात करोना विषाणूवरील कायम स्वरुपी औषधाच्या निर्मितीला दिशा देणारे ठरणार आहेत.