पुणे : पुणे शहरातील ससून रुग्णालयात प्रथमच रोबोटद्वारे नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ८ सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया झाली असून, सध्या रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारत आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावर यामुळे हास्य फुलले आहे.
शिरपूर (जि. धुळे) येथील विजय हिंमतराव पाटील यांना गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमधील गंभीर ऑस्टियो आर्थरायटिसमुळे तीव्र वेदना होत होत्या. चालणेही अवघड झाले होते. त्या
नंतर त्यांनी ससून रुग्णालय गाठले. त्यांच्यावर रोबोटने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी सर्जन डॉ. राहुल पुराणिक व डॉ. प्रवीण देवकाटे यांनी “क्युविस” रोबोटद्वारे त्यांच्यावर टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली.
महाराष्ट्रातील रुग्णालयात प्रथमच या पद्धतीची शस्त्रक्रिया झाली. याबाबत बोलताना पुणे बी.जे. मेडीकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर म्हणाले की, गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता येणार आहे. रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीचे अनेक फायदे आहेत.
या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे गुडघ्यातील सॉफ्ट टिश्यू लवकर बरे होतात. या शस्त्रक्रियेमुळे कमी वेदना होतात. रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे काम करते. रुग्ण यामुळे लवकर बरे होतात.
शस्त्रक्रिया झालेले विजय हिंमतराव पाटील म्हणाले की, पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळाली. यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.