आपलं आरोग्य नीट राहावं यासाठी सर्वच प्रयत्न करत असतात. काहीजण तर फिटनेसच्या बाबतीत चांगलेच कटाक्ष असतात. त्यात जीमला जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. असे असताना काहीजण व्यायाम करताना सर्वाधिक धावतात तर काही चालण्याला प्राधान्य देतात. पण तुम्हाला जर यातील नेमकं चांगलं काय हे माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
चालणे ही एक प्रभावी शारीरिक क्रिया आहे. जी सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांसाठी फायद्याची ठरते. तर धावणे हा तुलनेने कठीण व्यायाम आहे, जो तुम्हाला कमी वेळेत जास्त कॅलरीज् बर्न करून देतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती आणि शारीरिक शक्ती सुधारण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. चालणे हा व्यायामाचा सौम्य प्रकार मानला जातो. या व्यायामामुळे तुमच्या सांध्यांवर जास्त दबाव पडत नाही, त्यामुळे ज्यांना गुडघे किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम फायदेशीर मानला जातो.
चालणे हा एक व्यायाम आहे जो तुम्ही थकल्याशिवाय दीर्घकाळ करू शकता. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्यासाठी चालणे हा रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवणे फायदेशीर आहे. हा व्यायाम सर्व वयोगटातील लोकांसाठी सोपा मानला जातो.
धावण्याचे काय आहेत फायदे?
चालण्याच्या तुलनेत धावणे हा तुलनेने कठीण व्यायाम मानला जातो. ज्यांना कॅलरी जलद बर्न करायची आहे, त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. कॅलरीज बर्न केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा एक प्रभावी एरोबिक व्यायाम आहे, जो हृदयाला बळकट करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारण्यास मदत करतो. या व्यायामाच्या मदतीने शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यातही फायदा होऊ शकतो.