मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टर सोमवार (ता.२ जानेवारी) पासून संपावर जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण येणार असून नागरिकांना वेळेवर सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.
विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने संपाचे हत्यार उगारले आहे. अधिवेशन काळात मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी २ जानेवारीपासून संपावर जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच डॉक्टरांनी सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ जागांची पदनिर्मिती झाली नाही. दरम्यान मागच्या काही काळापासून शासनाकडे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होत आहे. यावर लवकरातलवकर निर्णय घेण्यात यावा. ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची पदेच भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही अपुरे पदे तातडीने भरणे तसेच मागच्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांना महागाई भत्ता देण्यात आला नाही. तो देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.
वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे असे निवेदनात सांगितलं आहे.