आपल्या शरीरातील उष्णता अनेक समस्यांचे कारण ठरू शकते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. पण हे कमी करणे अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणं अत्यंत गरजेचे आहे. कारण, वेळेवर जेवण केल्यानं शरीरातील अग्नीचा योग्य प्रकारे वापर होतो. त्यामुळे वेळेवर जेवण्याला प्राधान्य देणं गरजेचे आहे.
तसेच आहारात बदल करताना तिखट मसालेदार पदार्थ, आंबट फळं, आंबट पदार्थ, लसूण, आलं या पदार्थांचा वापर मर्यादेत असावा. काळी मिरी, लवंगा, दालचिनी या मसाल्यांचा वापर कमी करावा. तिळाचं तेल, एरंड्याच्या तेलाचा वापर टाळावा. याशिवाय, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचा समावेश करावा. आहारात काकडी, ब्रोकोली या भाज्या, आवळ्याचे पदार्थ, टरबूज, खरबूज ही फळं यांचं सेवन वाढवावं. यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होतेच सोबत आरोग्यही सुधारतं.
उन्हाळ्याच्या दिवसात ओव्याच्या पानांचा समावेश केल्यास फायद्याचे ठरू शकते. कारण, ओव्याच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. ओव्याची पानं सेवन केल्यानं शरीरातील ओलावा वाढतो. ओव्याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शरीरातील उष्णता कमी होते. आहारात पुदिना, कोरफड यांचा समावेश अवश्य करावा. शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवं, त्याने उष्णता कमी होण्यास मदत होते.