पुणे : महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जूनअखेर राज्यभरात डेंग्यूचे 1,146 रुग्ण आढळले असून त्यापैकी 305 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.जास्त लोकसंख्या आणि तपासण्यांमुळे ही संख्या जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यातील या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील 305 रुग्णांपैकी 147 रुग्ण पुणे शहर परिसरातील, 137 रुग्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, तर 27 रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत.“राज्य कीटक नियंत्रण विभागाने सर्व जिल्ह्यांना कृती आराखडा कार्यक्रम जारी केला आहे.
नागरिकांनी पाणी साचू दिले नाही तर डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असे राज्याचे कीटकशास्त्रज्ञ सांगतात. पावसाळ्यात काही भागात जास्त पाऊस येण्याची शक्यता असते. साहजिकच डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते.त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे.
डेंग्यू कसा ओळखाल?
सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो. अंगावर लहान-लहान पुरळ येतात. जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन् मळमळ होते.रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊन अशक्तपणा जाणवतो. डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार
उपप्रकार आहेत.
एडिस इजिप्ती व एडिस अलेबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला आजार होतो. डेंग्यू हा सामान्यत: आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रुग्ण बरे होतात. डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यू ताप लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
आजारापासून असे राहा दूर…
आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा. घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका. सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात.
आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.