लहू चव्हाण
पाचगणी : आजच्या काळातील मुले खेळापासून दूर जात असून मोबाईलवरील गेमवर रममाण होताना दिसून येतात. विद्यार्थ्यांना खेळांची आवड निर्माण व्हावी, मैदानात खेळण्यात येणारे खेळ आणि त्यामुळे लाभणारी शारीरिक तंदुरुस्ती हा मुख्य उद्देश ठेवून शाळांनी मैदानी खेळ विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले पाहिजेत असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी केले.
पाचगणी येथील सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,पांचगणी येथे वार्षिक खेळ समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी बेल एअर व सेंट झेविअर्स हायस्कूलचे संचालक फादर टॉमी व शिक्षक उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. “शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट नाव असणारी शाळा म्हणजेच सेंट झेवियर्स हायस्कूल “अशा शब्दात शाळेचा गुणगौरव केला.
या खेळ समारंभात विद्यार्थ्यांनी मार्चपास परेड, कवायत, झुंबा, रीले, धावण्याच्या स्पर्धा तसेच फुटबॉल वर्ल्डकपवर आधारित उत्तम फॉर्मेशन सादर करून सर्वांची मने जिंकली. शालेय मुलांच्या जीवनात खेळ व शारीरिक सदृढता किती महत्वाची आहे याचे महत्व संचालक फादर टॉमी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.