आपण निरोगी असावं असे सर्वांनाच वाटत असते. पण निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते. मात्र, अशा काही सवयी आहेत, त्याचा आपल्या दिनचर्येत समावेश केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात अन्न नीट चावून खावे, असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
साखर आणि मीठ यांचे आहारातील प्रमाण मोजकेच असावे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दूर राहत नाहीत. तसेच पाणी हे तर आपण पीतच असतो पण ते किती आणि कधी घ्यावे याला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. जेवताना किंवा काहीही खाताना पाणी पिऊ नये. खाणे संपल्यावर 45 मिनिटे किंवा जमल्यास एक तास पाणी पिणे टाळावे. विशेषतः पोट सुटलेल्या लोकांना ही सवय फार उपयोगी पडते.
नेहमी प्रवास करणाऱ्यांनी रोजचा व्यायाम चुकवू नये. प्रवासात खाण्याच्या वेळा चुकवू नयेत. तसेच चहाचे प्रमाणही कमी असावे. आपला नेहमीचा चहा न घेता आपण ग्रीन टी घेऊ शकतो. त्यात अनेक रोगप्रतिबंधक गुण आहेत.