बदलत्या जीवनशैलीनुसार आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. तुमचं हे असं करणं तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतं. त्यात सांधेदुखी, मणकेदुखी खूपच त्रासदायक ठरते. तुम्हाला देखील मणक्याचं दुखणं सतावत असेल तर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
सतत कॉम्प्युटरसमोर बसून तुमचं काम असेल तर तुम्ही दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन आळस दिल्याप्रमाणे आपले हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे केले पाहिजेत. मऊ मॅट्रेस सोडून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरू करावे. खुर्चीत बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकेल असे बसा. जर तसे नसेल होत तर पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी.
सकाळच्या वेळी पाठीवर आडवे पडून आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत किंवा एक-एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश आठ हा आकडा रेखाटावा. असे केल्याने कंबरेचे स्नायू मोकळे होऊन मणक्यावरील त्यांचा ताण कमी होतो. रोज तिळाचे तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी, असे केल्याने तुम्हाला चांगला फरक जाणवू शकतो.
पेनकिलरसारख्या गोळ्या घेणे टाळा. या गोळ्या यावरील इलाज नाही. त्यामुळे योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करा. अशा गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
डॉ. दर्शन गौड (न्यूरोसर्जन तज्ञ, विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर)