विशाल कदम
पुणे: जिवंत माणसांची नव्हे तर मृतदेहांचीही भाषा पुण्यातील एका रणरागिणीला समजत आहे. रणरागिणीने आत्तापर्यंत १ हजाराहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण आज पुण्यातील डॉ. अश्विनी भोसले या रणरागिणीच्या कार्याची माहिती थोडक्यात जाणून घेऊ या.
जिवंत रुग्णांच्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणाऱ्या विविध वैद्यकीय शाखेच्या महिला डॉक्टर आपण पाहतो. मात्र ससून रुग्णालयातील डॉ. अश्विनी भोसले या महिला डॉक्टर इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. वाघाचे काळीज असलेल्या डॉ. अश्विनी भोसले यांनी वेगळी शाखा निवडत पुरुषांचा प्रांत असलेल्या ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात पोस्टमॉर्टम करण्याला प्राधान्य दिले.
या क्षेत्रात काम करताना मृतदेह निर्जीव असला तरी त्याच्या शरीरावर व अंतर्गत झालेले वार, जखमांच्या माध्यमांतून तो बोलत असतो. फक्त ती भाषा न्यायवैद्यक शास्त्रातील डॉक्टरांना कळते, त्यापैकी एक आहेत. डॉ. अश्विनी भोसले होय.
डॉ. अश्विनी भोसले यांनी लहानपणी मालिकांमधून न्यायवैद्यक तज्ज्ञांचे कौशल्याचे काम पाहून त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ होण्याचा निर्धार पक्का केला. धुळ्यात एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससूनच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात (फॉरेन्सिक मेडिसिन) प्रथमच महिला म्हणून पदव्युत्तर पदवी घेत दोन वर्षापूर्वी थेट कामाला सुरुवात केली.
दरम्यान, हजारो पोस्टमॉर्टम करताना डॉ. आश्विनी कधीच डगमगल्या नाहीत. पण जेव्हा एका तीन वर्षाच्या लहान चिमुकलीचा बलात्कार झालेला मृतदेह, सात वर्षांच्या मुलाचा खून झालेला मृतदेह आणि कोरोना काळात कात्रज येथे जोडप्याने पोटच्या चिमुकल्यांना मारून स्वत: गळफास घेतलेले मृतदेह समोर पाहून त्यांचे वाघाचे काळीजही पाझरले होते.
ससून रुग्णालयातील विभागाचे प्रमुख डॉ. नरेश झंझाड म्हणाले कि, डॉ. अश्विनी यांनी आतापर्यंत सहकारी डॉ. मीनाक्षी मल्होत्रा यांच्यासोबत खून, बलात्कार, अपघात, जळीत अशा हजारो मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले. यामध्ये मृतदेहाची कवटीसह छाती, पोट फोडून अंतर्गत अवयवांचे बदल तपासणे, जखमांचे अवलोकन करून त्यावरून हा मृत्यू नैसर्गिक आहे का, त्याचा घातपात झालाय की, विषबाधा झाली याचा निष्कर्ष लावण्याची जबाबदारी पार पाडली. याबरोबरच मृत्यूचे अहवाल तयार करणे, बलात्कारांच्या केसेसचे अवलोकन, हाडांच्या वाढीवरून वय ठरवणे आदी कामेही केली आहेत.
ससून न्यायवैद्यकशास्त्र विभाग ज्युनिअर रेसिडेंट डॉ. अश्विनी भोसले म्हणाल्या कि, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून न्यायवैद्यक विभाग म्हणजेच डेड हाउस व चिरफाड करतात. तसेच मृतदेहातून अवयवय काढतात. व तो विकृत करतात अशी चुकीची धारणा समाजात आहे. एखादा नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या वाटत असलेल्या मृतदेहाचाही खून झालेला असू शकतो. अनेक वेळा पोस्ट मॉर्टेम करताना वरून जखम दिसत नसली तरी आतून ती दिसते. अशा प्रकारे आतापर्यंत मी अनेक मृतदेहांची उकल करून नातेवाइकांना न्याय देऊ शकले आहे. याचे मला मनापासुन समाधान वाटते.