Nagpur News : नागपूर : शस्त्रक्रिया म्हटले की जोखीम आलीच. त्यात हृदय किंवा मेंदूची शस्त्रक्रिया असेल तर ही जोखीम आणखी वाढते. कारण एका छोट्याशा चुकीमुळे यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो. मेंदूची शस्त्रक्रिया ही अत्यंत अवघड आणि धोकादायक असल्यामुळे ती टाळण्याकडे लोकांचा कल असतो. यामुळे बऱ्याच वेळा मेंदूच्या आजारांवरील उपचारही टाळले जातात. पण वैज्ञानिकांनी आता अवघड शस्त्रक्रियेशिवाय मेंदूवरील उपचार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. नागपुरातील डॉक्टरांनी एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून मोठे यश मिळवले आहे. अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी मेंदूतील ट्युमरची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयातील मेंदूरोग विभागात यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया रुग्ण शुद्धीत असतानाच करण्यात आली. त्यामुळे दोन्ही रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली शस्त्रक्रिया
नागपुरातील २० वर्षीय मिथिलेश गौतम आणि मध्य प्रदेशातील ३० वर्षीय रेखा झांजाळ यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यात त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. (Nagpur News ) मात्र, खासगी रुग्णालयात उपचार किफायतशीर नसल्याने अखेर त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये आणण्यात आले. ब्रेन ट्यूमरमुळे दोन्ही रुग्णांना बोलता देखील येत नव्हते. अखेर डॉक्टरांनी यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आणि रुग्णांचे समुपदेश करण्यात आले.
मेंदूची शस्त्रक्रिया करते वेळी रुग्ण घाबरलेले असतात. हा ट्युमर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाहून वाचा कंट्रोल होत असते. त्यामुळे हे ऑपरेशन रुग्णांना बधीर न करता जागृत अवस्थेत करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. ऑपरेशनवेळी रुग्ण घाबरु नये म्हणून ऑपरेशनच्या आधी रुग्णांचे समुपदेश करण्यात आले. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला पूर्ण बधीर न करता फक्त डोक्यातील नसांना बधीर करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. (Nagpur News ) रुग्णाला वेदना होऊ नये, म्हणून डॉक्टरांनी सलाईनद्वारे वेदनादायी औषध सुरू ठेवले होते. ट्युमर काढताना रुग्णांशी बोलणे सुरू होते. ज्यामुळे ट्युमर निघेल. केवळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक क्षेत्र बधिर करण्यात आले. याला वैद्यकीय भाषेत ‘अवेक क्रॅनिओटॉमी’ म्हणतात, अशी माहिती न्यूरो सर्जन डॉ. संजोग गजभिये यांनी दिली.
नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयातील मेंदूरोग विभागात सुमारे ४ कोटी खर्चून अत्याधुनिक मॉड्युलर ओटी उभारण्यात आली आहे. ही मेंदूशी संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी मोठे वरदान ठरत आहे. दोन्ही रुग्णांची शस्त्रक्रिया ही धोकादायक होती. दुखापत झाली असती तर दोघांची बोलण्याची क्षमताही गेली असती. केवळ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे हे दोन्ही रुग्ण आज ठणठणीत बरे असून या शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवे जीवनदान मिळाले आहे.
संबंधित शस्त्रक्रिया ही डॉ. प्रमोद गिरी आणि डॉ. संजोग गजभिये यांनी केल्या असून, यांनी झालेल्या सर्जरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “योग्य नियोजन आणि केलेल्या समुपदेशनाामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला एकमेव चिंता होती ती म्हणजे रुग्णांची बोलण्याची क्रिया नियंत्रित ठेवण्याची. सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी होऊन दोन्ही रूग्ण सुखरूप आहेत.
ब्रेन ट्यूमरसारखे अतिशय गुंतागुंतीचे आणि जोखमीचे आजार असतील तरी वेळेत योग्य उपचार आणि गरज पडल्यास शस्त्रक्रिया केल्यास मनुष्य सहज सामान्य जीवन जगू शकतो. मात्र संभाव्य आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्यात वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.(Nagpur News ) रुग्णालयातील दोन्ही रुग्णांचा ट्युमर निघालेला आहे. तसेच त्यांची वाचा आणि बोलणे व्यवस्थित आहे.
प्रमोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली न्यूरो सर्जन डॉ. संजोग गजभिये, सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकांत कलबगवार, न्यूरो ऍनेस्थेटिस्ट डॉ. शिल्पा जैस्वाल, डॉ. पंकज भोपळे, डॉ. मंगेश मुळावकर, डॉ. कमलेश रंगारी, डॉ. पियुष ठोंबरे यांच्या वैद्यकीय पथकाने ब्रेन ट्यूमर ‘अवेक क्रॅनिओटॉमी’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली, अशी माहिती डॉ. पंकज भोपळे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagpur News : धक्कादायक! महाराष्ट्रात पाच वर्षांत तब्बल ११५ वाघांचा मृत्यू…!
Nagpur News : तृतीयपंथी कलाकारांच्या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी