लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील शंभरहुन अधिक नागरीक डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या रोगांनी रुग्ण फणफणले आहेत. डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सदृश्य आजारांमुळे नागारिक त्रस्त झाले असुन, दोन्ही ग्रामपंचायतींनी व आरोग्य विभागाने तातडीने डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सदृश्य आजार रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर व कदमवाकवस्तीचे शहराध्यक्ष विशाल गुजर यांनी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.
पूर्व हवेलीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये डासांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार दूषित पाणी व कीटकांच्या प्रादुर्भावामुळे पसरत आहेत. आजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाने अद्यापही कोणतीही आवश्यक ती कार्यवाही केली गेलेली नाही. दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील शंभरहुन अधिक नागरीक या आजारामुळे विविध रुग्नालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या ढिम्म यंत्रणेला नागरिकांचा जीव गेल्यावर जाग येणार का? आणि आरोग्य विभाग फक्त कागदी घोडे नाचवण्यापुरता काम करतो का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले कि, बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया आदी साथरोगांचा फैलाव होत आहे. नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सतर्क रहा, आणि जर कोणाला या प्रकारची लक्षणे आढळून आली तर त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. आरोग्य विभाग पुढील तीन दिवसात घऱोघऱी जाऊन सर्वे करुन, याबाबतची नेमकी माहिती गोळा करणार आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, मागिल दहा दिवसाच्या काळात दोन वेळा फॉगीग करण्यात आलेले आहे. गरज लागल्यास तातडीने आनखी फॉगिग करण्याच्या सुचना ग्रामपंचायतीला करण्यात येतील . नागरीकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. टायर, कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक, कुंड्यांखालील ताटल्या, तुटलेली खेळणी यामध्ये पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे तयार होतात.
महानगरपालिका, ग्रामपंचायत वेळोवेळी याविषयी माहिती देण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम करत असते, त्यांना सहकार्य करावे. आपल्या सभोवताली असे पाणी साठत असेल तर ते पाणी नष्ट करायला हवे. डेंगू पसरविणाऱ्या एडिस डासाची मादी घरोघरी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वा ड्रममध्ये अळ्या घालते. त्यामुळे पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी करावी. घरांच्या खिडक्या, स्लायडिंगला मच्छरजाळी लावा. ही जाळी संध्याकाळी मच्छर आत येण्याच्या वेळी बंद करावी. सार्वजनिक बागांत कॅटलीप, गोंडा, रोजमेरी, सायट्रोनला गवत, सुगंधित जर्नीमस अशी डासांना दूर ठेवणारी झाडे लावता येतील असेही काळभोर यांनी यावेळी स्पष्ठ केले.
दरम्यान, डासांचे प्रजनन रोखणे व डासांना चावण्यापासून प्रतिबंध करणे हे दोन महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. डेंगीचे डासांच्या अळ्या स्वच्छ व स्थिर, साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात. त्यामुळे असे पाणी साठू न देणे हा सर्वात महत्त्वाचा व परिणामकारक उपाय आहे. यासाठी रिकामे टायर, डब्बे, छोटी डबकी, तुंबलेल्या गटारी, परिसरात व गच्चीमध्ये साठेलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करणे आवश्यक आहे. तसेच घरातील टाक्या, पिंप, हंडे, फ्लॉवरपॉट, फ्रिजच्या खालचा ट्रे, कुलर्स हे सुद्धा आठवड्यातून एकदा रिकामे करावे. ज्या टाक्या वगैरे रिकामे करणे शक्य नाही त्यांना घट्ट झाकणाने बंद करावे. खिडक्या व दारांना जाळी बसवावी. खास करून लहान मुलांना अंग पूर्णपणे झाकेल असे कपडे वापरावे. शक्य झाल्यास डेंगीच्या रुग्णास स्वतंत्र मच्छरदाणीमध्ये सुरवातीचे ५ ते ७ दिवस झोपवावे. असे आवाहनही डॉ. डि. जे. जाधव यांनी केले आहे.