पुणे : निरोगी केसांमुळे आपल्या सौंदर्यांत आणखी भर पडते. पण हे केस निरोगी राहण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी केसांना तेलाने मसाज करणे खूप गरजेचे आहे. हेअर मास्क किंवा अन्य कितीही हेअर ट्रीटमेंट घेतल्यातरी केसांना तेल लावायलाच हवे.
शॅम्पू किंवा कंडिशनरने केस कितीही चांगले धुतले तरी केसांना तेलाचा वापर केला नाही तर तुमचे केस मजबूत होऊ शकत नाहीत. तेल निवडताना,आपण केमिकल आधारित केसांचे तेल वापरत आहात की नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. केमिकल बेस तेलांपेक्षा घरच्या घरी तुम्ही आयुर्वेदिक तेल बनवू शकता.
एरंडेल, कापूर आणि खोबरेल तेल
केसांच्या वाढीसाठी, कापूर तेल, एरंडेल तेल आणि खोबरेल तेल समान प्रमाणात मिसळा आणि आपल्या मुळांना आणि केसांना मसाज करा. ते लावण्यापूर्वी डबल बॉयलवर थोडा वेळ गरम करा आणि नंतर वापरा.
कडुलिंब आणि खोबरेल तेल
काही कडुलिंबाची पाने दोन दिवस वाळवावीत. १०० मिली बदाम तेल वाळलेल्या कडुलिंबाच्या पानांसह उकळवा. आठवडाभर पाने तेलात भिजवून ठेवा. नंतर तेल गाळून घ्या आणि ते तुमच्या वापरासाठी तयार आहे.
नारळ आणि कढीपत्ता तेल
मूठभर कढीपत्ता दोन दिवस उन्हात वाळवा. नंतर १०० मिली खोबरेल तेलात उकळवा. गॅस बंद करून थंड होऊ द्या. नंतर हे तेलाचे मिश्रण गाळून घ्या आणि ते केस आणि टाळूची मालिश करण्यासाठी वापरा. यामुळे केसांच्या वाढीस मदत होईल.
काळे तीळ आणि खोबरेल तेल
फूड प्रोसेसरमध्ये एक चमचा काळे तीळ बारीक करा. काचेच्या बाटलीत ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल भरून त्यात बियांचे चूर्ण टाका. २-३ दिवसात तेल वापरासाठी तयार होईल. जेव्हा तुम्हाला तुमच्या टाळूची मालिश करायची असेल तेव्हा हे तेल थोड्या प्रमाणात गरम करा आणि ते वापरा.