मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव, गेल्या ८ महिन्यांत १४४२ जणांना लागण झाली असून, ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यापर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात होती. जून महिन्यापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४३२ जणांना लागण झाली आहे. पावसाळ्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन ही रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. स्वाईन फ्लूसंबंधी अधिक सतर्कता महत्त्वाची आहे. २८ ऑगस्टपर्यंत १४४२ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, ३० जणांचा मृत्यू झाला आहे. साथीच्या आजारांबरोबरच यंदा संसर्गजन्य असलेल्या स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढत असून, मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण म्हणजेच ४६१ रुग्ण मुंबईत आहेत.
पुण्यामध्ये २६० रुग्ण, तर ठाण्यात २२६ तर कोल्हापूरमध्ये १०३ रुग्ण असून एकही मृत्यू झालेला नाही. नाशिकमध्ये १९६ रुग्ण नागपूरमध्ये ३७ रुग्ण आहेत, तर नाशिकमध्ये १३ तर नागपूरमध्ये ११ अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेली असून, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे ३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत असून झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, मिझोराम या राज्यांमध्ये गेल्या एका महिन्यात स्वाईन फ्लूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेक लोक कोविड चाचणी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. स्वाईन फ्लू आणि कोविडची लक्षणे सारखीच
असल्याने लोकांमध्ये याबाबत संभ्रम वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
स्वाईन फ्लू रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष ठेवण्यात आला आहे. तसेच फ्लूसदृश रुग्णांचे वर्गीकरण करून विनाविलंब उपचार करण्यात तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्लू प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.