सध्या असुरक्षित लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गर्भधारणेचा हा धोका टाळण्यासाठी जोडप्यांमध्ये आपत्कालीन गोळ्यांचे सेवन लक्षणीयरीत्या वाढले आहे. संकोचामुळे बहुतेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता या गोळ्या घेतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
असुरक्षित लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी पिल किंवा आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी वापरली जाते. याला मॉर्निंग-आफ्टर पिल्स असेही म्हणतात. असुरक्षित शरीरसंबंधानंतर शक्य तितक्या लवकर आपत्कालीन गोळी घेण्याची सर्वोत्तम वेळ आहे. या गोळ्या 24 तासांच्या आत घेणे चांगले असते. मात्र, 72 तासांच्या आत या गोळ्या घेतल्यास गर्भधारणा टाळता येते. या गोळ्यांच्या जास्त सेवनाने हार्मोनल असंतुलन, अनियमित मासिक पाळी तसेच एक्टोपिक गर्भधारणा होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत असुरक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांनी डॉक्टरांशी बोलणे गरजेचे आहे.
यापूर्वी इमर्जन्सी पिल्सच्या दुष्परिणामांबाबत फारच कमी प्रकरणे पाहिला मिळत होती. मात्र, आता यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत इमर्जन्सी गोळ्यांच्या विक्रीत 10 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली जात आहे. या गोळ्या खरेदी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे याचा वापरही वाढल्याचे सांगण्यात आले.