Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि उत्तम आहार गरजेचा असतो. त्यात काही फळे देखील खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स् अर्थात जीवनसत्त्वे असतात. ते आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे केळी. केळी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. केळीमध्ये असे काही गुणधर्म आहेत ते रक्तदाब नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतात.
केळीमध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रथिनेमध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. अनेक प्रकारचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी केळीचे सेवन फायदेशीर ठरते. अतिसार आणि चिकनपॉक्समध्ये देखील हे खाण्याचा सल्ला दिला जातो. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. केळी हा पोटॅशियमचा खूप चांगला स्रोत आहे. केळीमध्ये 422 मिलीग्राम पोटॅशियम असते आणि ते सोडियम मुक्त देखील असते. जर आपण पोटॅशियमयुक्त अन्न खाल्ले तर ते रक्तदाब व्यवस्थापित करण्यास मदत करते. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि हे आपल्या पोटॅशियमच्या दैनंदिन गरजेच्या 10 टक्क्यांपर्यंत पूर्ण करते.
केळीमध्ये असलेले ‘व्हिटॅमिन बी 6’ न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन आणि डोपामाईन वाढविण्यात उपयुक्त आहे. जर आपल्या शरीरात ‘व्हिटॅमिन बी 6’ची कमतरता असेल तर यामुळे नैराश्याचा धोका वाढतो. केळी नैसर्गिकरित्या चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियम मुक्त असते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते.