पुणे: सध्या पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राभर तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच उपचार न केल्यास मृत्युही येवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी उष्माघातासंबंधी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
उष्माघात म्हणजे काय?
खूप कडक उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता जास्त निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असं देखील म्हटले जाते. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सभोवतालचे तापमान खूप वाढले की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडते. त्यामुळे शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो.
उष्माघात होण्याची कारणे :-
१. उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे.
२. कारखान्याच्या बॉयलरवर रुमध्ये काम करणे.
३. काच कारखान्यात काम करणे.
४. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
५. घट्ट कपडयाचा वापर करणे.
लक्षणे :-
१. मळमळ उल्टी, हात पायाला गोळा येणे,
२. धकवा येणे,
३. शरीराचे तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढणे
४. त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, काहीशी लाल होणे.
५. घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे.
६. निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत घडघड होणे,
७. रक्तदाब वाढणे
८. मानसिक अस्वस्थता, बेशुध्दवस्था इत्यादी.
अति जोखमीच्या व्यक्ती
१. बालके, लहान मुले, खेळाडू इत्यादी.
२. सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती.
३. वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय विकार,फुफ्फुसाचे विकार, मुत्रपिंडाचेविकार इत्यादी.
प्रतिबंधात्मक उपाय :-
१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे.
२. शक्य नसल्या थोडया वेळ सावलीत विश्रांती घेवुन पुन्हा काम करावे.
३. कामे सकळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
४. सैल पांढरे उष्णता शोषुन घेणारे कपडे वापरावीत.
५. उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे.
६. प्रवासाला जाताना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी
७. पाणी भरपूर प्यावे.
८. लिंबु शरब, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.
९. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इ. वापर करावा.
१०. घरामध्ये, कामाच्या ठिकाणी कुलर्स, वातानुकुलित यंत्र, वाळयाचे पडदे याचा वापर करावा.
११. उष्णतेची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रास संपर्क करा.
उपचार :-
उष्माघातावर त्वरीत उपचार करणे आवश्यक असते.
१. रुग्णास प्रथम सावलीत आणावे.
२. रुग्णाचे तापमान कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
३. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरीत उपचार सुरु करावेत.
४. रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरीत अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.
५. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे. खोलीतील पंखे, कुलर्स, वातानुकुलित यंत्र त्वरीत चालू करावेत.
६. रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यांस थंड पाणी, जलसंजीवनी दयावी.
७. रुग्णास चहा, कॉफी देऊ नये.
८. रुग्णाच्या काखेखाली आईसपॅक ठेवावेत, रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्यात.
९. थर्मामिटरने रुग्णाचे तापमान तपासात राहवे व ३३.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
१०. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा.